Thursday, May 28, 2020

माणसं सामावून घेणारा गाव उधवस्त!!



माणसं सामावून घेणारा गाव उधवस्त!!

घटना-१

      साखार कारखाना बंद झाल्यावर हरीनाना दरवर्षी गावाकडे जातो. पण या वर्षी त्याला सहजासहजी गावी जाता आलं नाही. कारखाना ५ एप्रिलला बंद झाला. त्या दिवसापासून हरिनाना बीड जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावी जाण्यासाठी प्रयत्न करत होता. पण लॉकडाऊन असल्यामुळे जाण्यासाठी परवानगी मिळाली नाही. मग काम बंद झाल्यावरही हरीनाना कारखान्यावरच थांबला. लॉकडाऊन मध्ये अडकल्यामुळे थोडीफ़ार मदत मिळाली. त्याचं आणि बायको लेकरांच पोटापाण्याचं भागत होत. पण बैलांना वैरण मिळवण्यासाठी खूप धावपळ करावी लागली. त्यात एकदा मध्येच अवकाळी पाऊस आला. त्यात कोपीत पाणी शिरलं. होतं नव्हतं ते सामान भिजलं. त्यामुळे अजून अडचणीत वाढ झाली. मग तर कारखान्याकडे हात पसरून दोन वेळंच जेवण मिळवलं आणि कसे तरी दिवस काढत होते. तेवढ्यात शासनाकडून जाहिर करण्यात आलं की जे कारखाने बंद झाले आहेत त्या मजुरांना गावी जाण्याची परवानगी देण्यात येईल. मग हरीनानाचा गावाकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला. कारखान्याने एक ट्रक मध्ये पाच गाडीवानाचा पसारा भरला. आणि ते बीड कडे निघाले. रात्रभर प्रवास करून ते गावाच्या जवळ आले. तर गावातील काही माणसांनी त्यांची ट्रक आडवली. आणि म्हणाले की तुम्हांला गावात प्रवेश नाही. हरीनाना आणि इतर लोकांना हात जोडले. पाया पडले तरी काही गावात प्रवेश दिला नाही. त्यांच्यातील एकाने ट्रकवर दगडं फ़ेकायला सुरू केलं. त्यामुळे शेवटी हरीनाना आणि ते गाडीवान गावापासून २ किमी अंतरावर माळावर गेले. तिथेचं सामान खाली करून घेतलं. ट्रक परत गेला. हरीनाना पसारा काडून कोप करू लागला. त्या सर्व गाडीवानानी तिथेच कोपी केल्या. तिथे पाण्याची व्यवस्था नव्हती की दुसरी काहीच सोय नव्हती. एक किमीवरून २५ ते ३० फ़ुट उपसा नसणा-या खॊल विहीरीतून पाणी काडून वापरू लागली. पण एके दिवशी पाणी काढताना हरिनानाच्या बायकोचा तोल जातो आणि ती विहीरीत पडून जखमी होते. आता ती दोन्ही पायाने आधू झाली आहे.





   



घटना-२
  अजिनाथ हा गेल्या वर्षापासून मुंबईला एका मिस्त्रीच्या हाताखाली बिगारी काम करत होता. लहान दोन मुलं होती. बायको लेकरा सह काम करून कसं तरी जगत होता. अचानक करोनाच वारं सुरू झालं. आणि लॉकडाऊन झालं. त्यामुळे हातचं काम गेलं. २४ मार्च पासून हाताला काम नाही. त्यामुळे गावाकडे जावं तर लॉकडाऊन झालेलं. मग त्यांने १४ एप्रिल पर्यंत वाट बघितली पण लॉकडाऊन काही संपल नाही. जवळचे सर्व पैसे संपले. आता करणार काय? काही दिवस रांगेत उभा राहून जेवण घेऊ लागला. पण त्याच्यातून त्यांची भूक भागू शकली नाही. उपाशी मरू लागले. मग त्यांने त्याच्या मूळ गावी जाण्याचा निर्णय घॆतला. जायचं कसं? पैसे नाहीत. वाहन सुरू नाहीत. मग तो बायकोसह दोन लहान मुलांना घॆऊन चालत निघाला.  १८ एप्रिलला निघालेला अजिनाथ ३ मे ला त्याच्या गावी पोहचतो. पायी चालत, कधी उपाशी तर कधी फ़क्त पाणी पेवून तो गावाच्या वेशीवर येतो. तिथं त्याला गावातील लोकांकडून आडवलं जात. त्याला गावाच्या बाहेर काढंल जात. त्यावेळी त्याची लेकरं, बायको रडत आहेत. त्याच्याही डोळ्यातून पाणी येत आहे. तो म्हणायचा, “सरपंच, आहो, म्या ह्याच गावचा, मला गावात घ्या.. दोन दिसापासून उपाशी हाय.. मला वाटायचं काय बी झालं तरी माझं गाव मला उपाशी मरू देणार नाय. म्हणून आलोय..आम्हांला त्या पडक्या घरात राहू द्या. म्या काय बी काम करीन आन पोट भरीन.. मला तो रोग झालेला नाय.” अजिनाथ विनवण्या करत होता. पण कुणाच्याच काळजाला पाझर फ़ुटत नव्हता. त्याचे आई-वडिल ही विनंती करत होते. पण त्यांच ही ऎकलं नाही. त्यांनाही सांगितलं की तुम्हांलाही गावाच्या बाहेर काढू. शॆवटी गावकरी त्याला गावाच्या बाहेर हाकलून लावतात.  गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक ही त्याला गावात राहण्यासाठी आधार देत नाहीत. गावातून बाहेर जाताना तो रडत रडत म्हणत होता.. “आम्हांला पाणी तर द्या.. लय आशेनं आलोय.. खूप तहान लागलीय..” पण कोणी पाणीही दिलं नाही. तो गावाच्या बाहेर जातो. जाताना मागे वळून वळू बघत होता.. आणि डोळ्याचे आश्रू शर्टच्या भाईने पुसत होता. तो गावाच्या बाहेर जाऊन बायको मुलांना फ़ाशी देवून तोही फ़ाशी घेतो.



     हरीनाना आणि अजिनाथ यांना कोणी उधवस्त केलं? हा प्रश्न आज प्रत्येकाने स्वत:ला विचारला पाहिजे. करोना हा एक साथीचा रोग आहे. तो आज ना उद्या बरा होईल. पण वर्षेन वर्षी गावात जिंवत असणारी माणूसकी लयाली गेली याच जास्त दु:ख होत आहे. हरीनाना व अजिनाथ यांना कोरोना झाला होता का? त्यांच्या तपासण्या केल्या होत्या का? ते कोणत्या अडचणीतून येत आहेत? अगोदरचं त्यांच खच्चीकरण झालं आहे. त्यामुळे त्यांना त्या त्या गावातील स्वता:ला प्रतिष्ठीत समजणा-या व गावाचा कारभार हाकणा-यांनी आधार देण गरजेचं होतं. पण आज घडीला गावा-गावात अनेक गैरसमज पसरले आहेत. त्यातून गावातील पूर्वीच्या काळी असणारी माणूसकी नेस्तानाबूत झाली आहे. गावाच गावपण केंव्हाच संपल आहे. शिल्लक राहिले आहेत ते जिवंत मानवी सांगाडे जे फ़क्त पैसा व माणूसकीहीन जिवन जगत आहेत. काही मोजकेच जाणकार लोक समजावून घेवून अशा समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यांच्याकडे सत्ता नाही. त्यामुळे त्यांच कोणी जमू देत नाहीत. आज त्यांची अवस्था म्हणजे नखे काढलेल्या वाघासारखी झाली आहे. याला जबाबदार कोण? या प्रश्नाचं उत्तर शोधण्य गरजेच आहे. आज जे भ्रमात आहेत की गाव एक संस्कृती आहे. गावात सर्व काही आजही शिल्लक आहे. हा पोकळ भ्रम सोडून वास्तव स्वीकारून गावाची पूर्नरचना होणं गरजेच आहे. नाहीतर व्यवस्थेतील सोकावलेले लांडगे हरीनाना, अजिनाथ सारखे असंख्य बळी घेतील. आज हे दिसून आलं ते करोनाच्या निमित्ताने.. पण हे रूजू लागलं.. याच्यावर वेळीच घाव घालण आवश्यक आहे नाहीतर करोना पेक्षाही महाभयंकर हा रोग आहे.  



माणसं सामावून घेणारा गाव उधवस्त!!

माणसं सामावून घेणारा गाव उधवस्त!! घटना-१       साखार कारखाना बंद झाल्यावर हरीनाना दरवर्षी गावाकडे जातो. पण या वर्षी त्याला ...